मुळशीत लवकरच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू होणार

खासदार सुप्रिया सुळेंचा पुढाकार तर जिल्हा परिषद करणार पुर्ततेची कार्यवाही



हिंजवडी ग्रामपंचायत सभागृह : येथे पार पडलेल्या आढावा बैठकीस खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह उपस्थित मान्यवर


हिंजवडी  :  मुळशी तालुक्याच लवकरत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) देखील यासाठी अनुकूल असल्याचे हिंजवडी, ता.मुळशी येथे काल झालेल्या आढावा बैठकीत निष्पन्न झाले आहे. एमआयडीसीने या प्रकल्पासाठी जागा आरक्षित केल्याचे पत्र दिल्याने जागेची मोठी अडचण सुटली आहे.


            पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी एमआयडीसीला या प्रकल्पासाठी जागेची मागणी केली होती. त्यानुसार एमआयडीसीने ए एम 11 येथील 20 हजार चौरस मीटर क्षेत्र घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी राखीव ठेवत असल्याचे पत्र जिल्हा परिषदेला सुपुर्द केले आहे. त्यामुळे घनकचरा प्रकल्पासाठी असलेली जागेची सर्वात मोठी अडचण दुर झाली असून जिल्हा परिषदेकडून तातडीने कार्यवाही करून प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहाय्य आणि पुर्तता करणार असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी या बैठकीत जाहिर केले.   


            हिंजवडी ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये काल सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत घनकचरा व सांडपणी व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, गटविकास अधिकारी संदीप जठार, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, माजी सरपंच दत्तात्रय साखरे, माजी सरपंच सागर साखरे, प्रशासक सुनिल जाधव, ग्रामविकास अधिकारी तुळशीराम रायकर, एमआयडीसी अधिकारी मिलिंद टोणपे, बाळासाहेब तापकीर, निलेश पाडाळे आणि विविध ग्रामस्थं उपस्थित होते.


            यावेळी हिंजवडी ग्रामपंचायतीने घेतलेल्या रुग्णवाहिका, अंत्ययात्रेसाठी लागणारे वैकुंठ रथ वाहन, औषध व सॅनिटायझर फवारणीसाठी बोलेरो गाडी, व कचरा संकलनासाठी घेतलेल्या 10 ढकलगाड्या यांचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पूजन करून लोकार्पण करण्यात आले. ग्रामस्थांची मोठी सोय यामुळे होणार आहे. ग्रामपंचायतने राबवलेल्या योजना, विविध विकासकामे, भविष्यातील संकल्प याबद्दल प्रशासक सुनिल जाधव यांनी दृकश्राव्य माध्यमातून सुळे यांना माहिती दिली. सुळे यांनी यावेळी हिंजवडी ग्रामपंचायतचे विशेष कौतुक केले.



हिंजवडी : येथे विविध वाहनांचे लोकार्पण करण्यात आले त्या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे व मान्यवर. तर  हिंजवडी ग्रामपंचायतचे कर्मचारी व विविध पदाधिकारी सुळे यांच्या समवेत दुसऱ्या छायाचित्रात दिसत आहेत.


घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी ग्रामपंचायतींनी केला होता पाठपुरावा


            एमआयडीसी परिसरातील ग्रामपंचायती यामध्ये हिंजवडी, माण, म्हाळुंगे यांनी संयुक्तित एक आढावा बैठक घेऊन या प्रकल्पासाठी विचारविनिमय केला होता. तसेच यासाठी पाठपुरावाही सातत्याने करत आले होते. या सर्वातून मार्ग कसा काढता येईल, जागा कशी उपलब्ध होईल हेदेखील चर्चेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न केला. याची फलनिष्पत्ती म्हणून आज जागा उपलब्ध झाली आहे.


            जिल्हा परिषदेने त्यावर कार्यवाही करून प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा म्हणून प्रयत्न केल्यास ग्रामपंचायतींचा पाठपुरावा मार्गी लागणार आहे. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची भुमिका आणि पुढाकार देखिल महत्वाचा आहे. सुळे यांनी यासंदर्भात लवकरच पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद, पीएमआरडीए, एमआयडीसी यांच्याशी संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.


......................................................................................................................................


(आमच्या बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा. आणि 'हिंजवडी टाईम्स' च्या न्यूज चॅनलला  Youtube  वर  बस्क्राईब करा )