भुगाव ग्रामस्थांचे प्रयत्न, रामनदीचे होणार खोलीकरण व रूंदीकरण
भुगाव : मुळशी तालुक्यातील भुगाव ग्रामस्थांनी राम नदी पूर्वी होती तशीच आता पुन्हा करण्याचा ध्यास घेतला आहे. पूर्वीची राम नदी होती तशीच आता पुन्हा करण्याचा विडा ग्रामस्थांनी उचलला आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनच्या सहकार्याने या राम नदीच्या खोलीकरणास आणि रुंदीकरणास सुरुवात केली असून लवकरच तिचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून भविष्यामध्ये हा उन्हाळा अतिशय
भयानक आणि उग्र स्वरूप धारण करणार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये पाण्याची कमतरता होऊ
नये तसेच ते पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी हे पाऊल उचलले आहे. राम
नदीवर ज्यांनी ज्यांनी अतिक्रमणे केली आहे ती सगळी अतिक्रमणे शासनाच्या सहकार्याने
काढण्यात येणार असून पूर्वी जशी रामनदी होती तशीच ती आता सुंदर आणि स्वच्छ करण्यात
येणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.
या कामासाठी नाम फाउंडेशनच्यावतीने एक पोकलेन देण्यात आला आहे. जोपर्यंत
राम नदीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत नाम फाउंडेशनकडून पोकलेन मशीन या कामासाठी
ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
राम नदीचे पुनरुज्जीवनाचे काम करत असतानाच भुगाव आणि भुकूम या दोन्ही
गावांच्या वेशीवर असलेला छत्रपती शिवाजी महाराज जलाशय या जलाशयातील पाण्याची पातळी
खाली गेलेली असून लवकरच या तलावाच्या खोलीकरणालाही नाम फाउंडेशनच्या सहकार्यानेच
सुरुवात करण्यात येणार असल्याचेही ग्रामस्थांनी यावेळी आवर्जून सांगितले.
गेल्या वर्षी या तलावामधून पाच हजार ट्रक माती आणि मुरूम काढण्यात आला होता, त्यावेळी सुद्धा नाम फाउंडेशनचे सहकार्य लाभले होते. गतवर्षी या तलावातील माती
गाळ मुरूम काढण्यासाठी परिसरातील अनेक उद्योजकांनी तसेच दानशूर लोकांनी आर्थिक मदत
केली होती. त्यामुळे या तलावातील पाण्याचा साठा बऱ्यापैकी वाढलेला आहे.
स्वयंभू श्री रामेश्वराच्या जवळून या राम नदीचा उगम होतो व श्री
सोमेश्वराच्या जवळ या राम नदीचा शेवट होतो. त्या स्वयंभू श्री रामेश्वर आणि श्री
सोमेश्वर तसेच भुगाव मधील श्री शंभू महादेव आणि भुगावचे ग्रामदैवत पद्मावती आई
पद्मावती देवी यांच्या आशीर्वादानेच ही दोन्हीही कामे किंवा कामे यशस्वी आणि पूर्ण
होणार आहेत,
असा विश्वास दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी व्यक्त केला.
दोन्हीही गावांमध्ये नागरिकीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले असून या या
तलावाची पाण्याची साठवण क्षमता वाढवणे गरजेचे आहे. यासाठी यावर्षी सुद्धा
परिसरातील उद्योजकांनी तसेच ग्रामस्थांनी सढळ हाताने या तलावाच्या कामासाठी मदत
करावी, अशी मागणी दोन्ही गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
.............................................................................................................
आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा.
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)