पौड येथे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी सामोपचाराने मिटवला वाद
पौड : शिवजयंती साजरी करण्यासाठी पौड येथे तालुकास्तरावर समिती तयार करण्यात आली होती. मात्र स्थानिक तरुण जे शिवकार्यात स्वतःला अखंड वाहून घेत असतात, त्यांना या समितीने काहीच विश्वासात न घेतल्याने आक्रमक झाले होते. शिवजयंती कार्यक्रमास त्यांचा कसलाच विरोध नव्हता, मात्र समिती ही पौड गाव पातळीवरच असावी अशी ठाम भूमिका घेतल्याने स्थापन झालेली समिती संबंधितांना रद्द करावी लागली आहे. विशेष म्हणजे मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले व पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सामोपचाराने हा वाद पोलीस स्टेशनमध्ये बसून मिटवला आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेचं कौतुक होत आहे.
माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी प्रत्येकी ५० लक्ष निधी उपलब्ध करून आणला असल्याची माहिती पोलीस स्टेशन येथे दिली. त्यामुळे यावेळी शिवजयंती भव्य साजरी करण्यासाठी त्यांनी एक समिती स्थापन केली व त्यात पौड गावचे सरपंच व तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक यांना या समितीत घेतले.
मात्र स्थानिक तरुणांना या समितीत न घेतल्याने, त्यांचे कष्ट खरंच स्मारकासाठी व तेथील कामकाजासंदर्भात मनापासून प्रयत्न असल्याने त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे कोणालाही दुखावून आपल्याला शिवकार्य करायचे नसल्याने ही समिती रद्द करत असल्याचे कंधारे यांनी तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी व पत्रकार यांच्यासमोर जाहीर केले. मात्र स्थानिक तरुणांनी कंधारे यांच्याकडून समिती रद्द करत असल्याचे लेखी पत्र घेतले व शिवजयंतीच्या कोणत्याही कार्यक्रमास विरोध नसल्याचे सांगितले.
यावेळी कंधारे म्हणाले की, पौड हे तालुक्याचे ठिकाण म्हणून मी तालुकास्तरीय शिवजयंती साजरी व्हावी म्हणून प्रयत्न केला व समिती स्थापन करून विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. मात्र ही समिती रद्द करून पौड ग्रामस्थ व त्यांच्या भूमिकेचं स्वागत करून त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवतो. भविष्यात पौड ग्रामस्थ म्हणतील तसे नियोजन व समितीबद्दल निर्णय घेण्यात येईल. सर्व मुळशीकरांनी उद्या १९ फेब्रुवारीच्या शिवजयंतीच्या मिरवणुकीस व शिवव्याख्यानास सायंकाळी पौड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, या शिवजयंतीच्या कार्यक्रमात ५० लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन होणार असल्याचे आयोजकांकडून समजले आहे. मात्र त्यावर तांत्रिक गोष्टींवरून तसेच त्याला संभाव्य राजकीय विरोधावरून पुढील काळात राजकीय घडामोडी घडू शकतात, अशी चर्चा आहे.
मात्र शिवजयंतीच्या कार्यक्रमास सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहून शिवाव्याख्याते गणेशजी शिंदे यांच्या शिवाव्याख्यानाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
.............................................................................................................
आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा.
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)