पौडजवळ घरफोडी करणाऱ्या चोरांचा थरारक पाठलाग, एक सापडला तीन मात्र फरार

पौड : मुळशीतल्या पौडजवळील विठ्ठलवाडीच्या ओंबळेवाडीत चोरांनी दहशत माजवून घरफोडी केली. मात्र हे चोर पलायन करत असताना ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने थरारक पाठलाग करून एकाला पकडले. तर त्याचे इतर तीन साथीदार फरार झाले आहेत. बुधवार दि.९ ऑक्टोबर २०२४ च्या पहाटे ३ ते ४ च्या सुमारास ही घटना घडली.

      पकडलेल्या अट्टल चोराला त्याच्याकडे असलेल्या एअरगन सहित पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पळताना चोर तारांच्या कंपाऊंडला धडकून जखमी झाल्याने त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शरद अर्कास काळे (रा. अहमदनगर) असे त्याचे नाव असून पुढील तपास पौड पोलीस करत आहेत.

      पहाटे तीनच्या सुमारास ओंबळेवाडीत चोरटे शिरले होते. लोखंडी कटरच्या सहाय्याने त्यांने घरापाठीमागील दरवाजाचा कोयंडा काढला व राजेंद्र बापू ओंबळे यांच्या घराच्या पाठीमागून प्रवेश केला. कटरनेच लोखंडी खिडक्यांच्या जाळ्या कापल्या. आतल्या खोलीतील लाकडी कपाट उचकटले. ओंबळे यांच्या पँटच्या खिशातून साडे नऊ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून पळून चालले होते. घरातल्या एका सदस्याला आतल्या खोलीत कोणीतरी शिरल्याचे लक्षात आल्यावर गावातील लोकांना फोन करण्यात आले. लोकांनी चोरांना पडकण्यासाठी येताच चोर पळून जाऊ लागले. पळता पळता लपून छपून अंधारात एअरगन चालवल्याने लोकांमध्ये खरी बंदूक असल्याची दहशत बसली.

      तरीसुद्धा लोकांना त्यांचा माग न सोडता त्यांचा पाठलाग केला. तारांच्या कंपाऊंडवरून लिलया उड्या मारून पळणारे चोर मात्र एका उंच कंपाऊंडला धडकला व जखमी होऊन रक्तस्राव होऊ लागला. ग्रामस्थांनी त्याला त्याच्याकडे असलेल्या एअरगनसहित पोलिसांच्या स्वाधीन केला. त्याचे तीन साथीदार फरार असून त्यांच्याकडे एअरगन सोबतच घातक लोखंडी हत्यारं होती. सापडलेल्या शरद काळे याच्यावर इतर पोलिस ठाण्यातही चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासात आणखी काही गोष्टी स्पष्ट होतील.

मुळशीत चोरांची दहशत, टोळ्या सक्रीयपोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष

     मुळशीत गेले अनेक महिने झाले चोर्यांचे सत्र सुरू असून चोरांकडे घातक शस्त्रे असल्याच्या चर्चांवर शिक्का पडला आहे. यापुर्वी गोडांबेवोडी येथे तीन चोरांना नागरिकांनी पकडले आहे. तर अनेक ठिकाणी संशयित नागरिकांच्या कचाट्यात सापडले असून ठोस पुराव्याअभावी ते निर्दोष सुटले आहेत तर काही निर्दोष देखील नागरिकांच्या तावडीत सापडले आहेत.

      त्यामुळे आता पोलिसांना विशेष कृती दल स्थापन करून चोरांना चाप लावावा लागणार आहे. चोरांच्या टोळ्या सक्रीय असण्याच्या शक्यता आता उदयाला येऊ लागल्या आहेत. शिवाय घातक हत्यारं घेऊन धाडसी चोरी करण्याचे प्रयत्न या चोरांकडून होऊ शकतात. त्यामुळे गावस्तरावर ग्रामसुरक्षा दलं स्थापन करावी लागणार आहे. तर लवळे सारखी गैरसमजुतीची घटना न होण्यासाठी देखील काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे चोरी या विषयाच्या बाबतीत मोठं शिवधनुष्य पोलिसांना आणि सोबतच नागरिकांनाही घ्यावं लागणार आहे.

चोराला पकडून दिलं, त्यानंतर युवक घरी आला अन् भलतंच घडलं...

...............................................................................................................

आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा. 

https://rb.gy/aeqs0k

...............................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)