संग्राम थोपटे यांचा विश्वास, कासारआंबोली येथे प्रचारा दरम्यान विरोधकांचा खास शैलीत समाचार
कासार आंबोली : मातोश्रीचा आदेश हा शिवसैनिकांसाठी शिरसावंद्य असून त्या आदेशाने शिवसैनिक जोमाने प्रचार करतील असे प्रतिपादन संग्राम थोपटे यांनी कासार आंबोली येथे सोमवारी रात्री केले. भोर विधानसभा निवडणूक प्रचार दौऱ्यात ते बोलत होते.
थोपटे म्हणाले की, कासार आंबोली गावात अनेक विकासकामं राबवण्यात आली, त्यामुळे कासार आंबोली ग्रामस्थ मोलाची साथ देतील यात शंका नाही. महाविकास आघाडी दमदार काम करत असून शिवसेनेमुळे महाविकास आघाडीला मोठे बळ मिळाले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ज्यांना राजकारणात आणलं, राजकारण शिकवलं त्यांनी पवार साहेबांना सोडून एका रात्रीत पक्ष बदलला. या अशा एका रात्रीत पक्ष बदलणाऱ्यांचे करायचे काय? जनताच त्यांना आता मतांतून धडा शिकवतील.
सध्या बेरकी राजकारणी झाले आहेत. सकाळी इकडं तर दुपारी तिकडं. ज्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष स्थापन केला त्या पक्षाचे उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदी विराजमान केले. त्यांनाही ऐनवेळी सोडून जाणारे पक्षात होते, ते गेले. बेरकी राजकारण करणाऱ्यांना राजकीय भवितव्य नाही.
महायुतीचा आमच्यावर लय जीव म्हणत विशेष शैलीत थोपटे यांनी समाचार घेतला. ते बोलले, आज कोंढावळे गावात जाण्याचा योग आला. तिथे एकाच गावात दोन जिल्हा नियोजन समितीची पदं, भुगावमध्ये १ पद तर भोर तालुक्यात केळावडे या हायवेलगतच्या गावात १ पद आणि वेळू या गावात शिंदेंच्या शिवसेनेला एक पद अशी एकूण ५ जिल्हा नियोजन समितीची पदं मतदारसंघात देऊन महायुतीने चांगलाच प्रेमाचा वर्षाव केला आहे, असे मिश्किल वक्तव्य केले.
यावेळी महादेव कोंढरे, ऍड.शिवाजी जांभुळकर, गंगाराम मातेरे, दादाराम मांडेकर, कोमल वाशिवले, विलास अमराळे, राम गायकवाड, निकिता सणस, सविता गवारे, सुहास भोते, मधुर दाभाडे, उमेश सुतार, अविनाश शिंदे तसेच ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा.
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)