चोराला पकडून दिलं, त्यानंतर युवक घरी आला अन् भलतंच घडलं...

मुळशीतल्या पौड-विठ्ठलवाडीतील ओंबळेवाडा येथे शोककळा

पौड : मुळशी तालुक्यातील विठ्ठलवाडीच्या ओंबळेवाडीत चोर रंगेहाथ पकडला गेला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोर घरफोडी करून पळत असतानाच ग्रामस्थांच्या तावडीत सापडला. थरारक पाठलाग करत चोरांकडून स्वतःच्या बचावासाठी गन फायरिंगचे बार हवेत काढल्यानंतरही ओंबळेवाडीतील धाडसी ग्रामस्थांनी त्याला जेरबंद केला. त्याचे ३ साथीदार मात्र पळून गेले. या घटनेनंतर ग्रामस्थांनी चोराला पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र चोराला पकडण्यासाठी धावलेल्यांपैकी एका युवकाच्या छातीत घरी आल्यावर दुखू लागले. त्याला उपचारासाठी पुणे शहरातील रुग्णालयात दाखल केले असता हृदयविकाराच्या झटक्याने त्या युवकाची प्राणज्योत मालवली. त्यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. अक्षय अंकुश ओंबळे (वय २८ रा.ओंबळेवाडी, पौड, ता.मुळशी) असे या युवकाचे नाव आहे.

     ९ ऑक्टोबर रोजी पहाटे तीन ते चारच्या चोराला पकडण्याची घटना घडली. यावेळी गावात शिरलेल्या चोराला पकडण्यासाठी पहाटे तीनच्या सुमारास अक्षयही इतरांसमवेत पळाला होता. सकाळी सहाच्या सुमारास चोराला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर ग्रामस्थ आपआपल्या घरी गेले. त्याचवेळी अक्षयला छातीत दुखण्याचा त्रास सुरू झाला. साडेनऊच्या दरम्यान हा त्रास खूप वाढला. श्वासोच्छवासाचाही त्याला त्रास होवू लागला. त्यामुळे गावातील लोकांनी, नातेवाईकांनी त्याला पुण्यातील सह्याद्री रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

     अक्षय हा गेली तीन वर्षापासून स्वतःची टूरिस्ट गाडी चालविण्याचा व्यवसाय करत होता. वडीलांचे कृपाछत्र लहानपणीच हरविल्याने बारावीपर्यंत शिकून तो व्यवसायाला लागला होता. त्याच्यापाठीमागे आई, एक मोठा भाऊ, बहीण असा परिवार आहे. अक्षयच्या आकस्मिक निधनाने विठ्ठलवाडी, ओंबळेवाडीत, पौडसह मुळशी तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

...............................................................................................................

आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा. 

https://rb.gy/aeqs0k

...............................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)