पाळीव प्राण्यांची मुळशीत समाजकंटकांकडून तस्करी

धरण भागात ७ ते ८ घटना, नागरिकांची पोलिसांकडे धाव

पौड : गुंगीचे औषध देऊन पाळीव प्राण्यांची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुळशी तालुक्यात धरण भागात घडत आहे. याबद्दल धरण भागातील नागरिकांनी पौड पोलिसांकडे याबद्दल फिर्याद नोंदवली असून समाजकंटकांना अटक करण्याची व हा प्रकार रोखण्याची मागणी केली आहे.

      मागील काही दिवसांपासून आंबवणे ग्रामपंचायत हद्दीत अज्ञात समाजकंटकांद्वारे गावकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांना यामध्ये गाय व बैल यांना कसलेतरी गुंगीचे औषध देऊन मारण्यात येत आहे व मारल्यानंतर त्यांचे अवयव कापून नेले जात आहेत. गेल्या काही दिवसात अशाप्रकारच्या ७ ते ८ घटना आमच्या भागात झालेल्या असून याबद्दल गावकऱ्यांच्या मनात भीती तसेच तीव्र संताप आहे.

      मागील आठवड्यात ७ सप्टेंबर २४ या तारखेला अशीच एक घटना आंबवणे गावच्या हद्दीत नांदगाव येथे घडली असून तेथे आंबवणे गावातील अनंता वाळंज यांच्या बैलाला मारून त्याच्या अवयवांची तस्करी करण्यात आली. याबाबतचे पुरावे देखील पौड पोलिसांना देण्यात आले आहे. हिंदू संस्कृतीमध्ये देवाचे स्थान असलेल्या व कुटुंबाचा आधार असलेल्या ग्रामस्थांच्या गायी, बैल अश्या दुभत्या जनावरांना जे कोणी मारून दुष्कृत्य करत आहेत त्यांचा लवकरात लवकर तपास करून योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी. सदर बाब ही अतिशय गंभीर स्वरूपाची असून याबाबत तपास लवकरात लवकर करण्यात यावा अशी एकमुखी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी केली.

      पौड पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी संबंधित समाजकंटकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून ग्रामस्थांनीही संशयितांवर लक्ष ठेवावे व पोलिसांना संशयितांबद्दल माहिती द्यावी असे आवाहन केले आहे.

      यावेळी ज्येष्ठ नेते नंदकुमार वाळंज, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे, माजी सभापती कोमल वाशिवले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष प्रवीण धनवे, मिलिंद कॅनरी फार्मचे दादा वाळंज, कुंभेरीचे सरपंच ज्ञानेश्वर दाभाडे, उपसरपंच नवनाथ दाभाडे, अमित आखाडे, रवी हुंडारे, निलेश मेंगडे, ॲड.आबासाहेब मरवडी तसेच इतर ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

...............................................................................................................

आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा. 

https://rb.gy/aeqs0k

...............................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)